बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींनी पकडण्यात यावं यासाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं होतं. मनोज जरांगे यांच्या मध्यस्तीनंतर आता 12 तासांपासून सुरू असलेलं हे आंदोलन ग्रामस्थांनी आता मागे घेतलं आहे.  या हत्याप्रकरणी दोन आरोपींनी पकडण्यात आलं आहे तर इतर चार जण फरार असल्याची माहिती आहे. 


केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर जिल्हाभर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. मस्साजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून  तब्बल 12 तास अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं होतं. 


आंदोलन चिघळू नये म्हणून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पाच तास आंदोलकांमध्ये सहभाग घेऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आंदोलन स्थळी दाखल झाले. पाच तासानंतर पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या मागे घेऊन देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.


दोन आरोपींना अटक


केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. जयराम चाटे आणि महेश केदार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येत सहा जणांचा सहभाग असल्याची माहिती असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून सहा पथकं स्थापन करण्यात आली आहेत. 


घटनेनंतर संतप्त जमावाकडून रास्ता रोको करण्यात आलं, तर याप्रकरणी पीएसआय राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे.  तसेच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. तर दोन विशेष पथक आरोपींच्या मागावर असल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 


नेमकं काय घडलं? 


संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.