Continues below advertisement

बीड: आपल्या गावात जसं एसटी बस स्टँड असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच आपल्या गावात रेल्वे स्टेशनही (Railway) असायला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. दळणवळणाचा महत्त्वाचं साधन आणि देशाला जोडणारा मार्ग म्हणून भारतीय रेल्वेचे जगभर ख्याती आहे. मराठावाड्यातील बीड (beed) जिल्हा या रेल्वेमार्गापासून वंचित होता. त्यामुळे, गेल्या तीन पिढ्यांपासून बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं, रेल्वेची शिट्टी वाजावी, रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं. अखेर, हे स्वप्न सत्यात उतरत आहे. मराठवाडा (Marathwada) मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत उद्या अहिल्यानगर ते बीड या रेल्वे लोहमार्गावर पहिली रेल्वे धावणार आहे. त्यामुळे बीडकरांचं स्वप्नांची पूर्तता या निमित्ताने होत असल्याचा आनंद बीडसह मराठवाड्यातील प्रवाशांना आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती, बीडच्या दिवंगत नेत्या आणि माजी खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी बीड रेल्वेची मागणी केली होती. तर, दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, आता त्यांच्या पश्चात बीडकरांची ही मागणी आणि स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे, बीडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, बीड-पहिल्यानगर लोहमार्गावर नेमकी किती स्थानके असणार, या मार्गावर रेल्वे नेमकी कशी धावणार? हे पाहण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. तर, काही शाळांकडून विद्यार्थ्यांना पहिल्या रेल्वे प्रवासाची सफर घडवत संस्मरणीय अनुभवही दिला जात आहे.

Continues below advertisement

बीडच्या रेल्वेची नेमकी वैशिष्ट्य काय?

अहिल्यानगर-बीड हा 261 किलोमीटरच रेल्वे लोहमार्ग आहे.

अहिल्यानगर बीड मार्गादरम्यान 16 रेल्वे स्थानक असणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी निधी देत बीडकरांची स्वप्नपूर्ती केलीय.

बीडच्या पालवण भागात बीड रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून उद्या या मार्गावर पहिली रेल्वे धावणार आहे.

अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवासाला 5 तासांचा अवधी लागणार आहे.

बीडच्या रेल्वेसाठी यांचे योगदान

बीडच्या दिवंगत नेत्या आणि तत्कालीन खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी बीडसाठी पहिल्यांदा रेल्वेची मागणी केली. स्वर्गीय अमोल गलधर यांच्यासह रेल्वे कृती समितीने आंदोलनाचा लढा उभारला. त्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी त्याचा पाठपुरावा केला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर माजी खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला. तर, आता विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या काळात ही रेल्वे बीडमध्ये येत असून बीडकरांच्या तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती होतानाचा दिवस अखेर उजाडलाय.

हेही वाचा

अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत