बीड : जिल्ह्यामध्ये यापुढे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. अशा पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत कावत (Beed SP Navneet Kanwat ) यांनी दिला. जिल्हा पोलिस प्रमुखांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी आता बीड पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळात बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर खात्री न करता पोस्ट केले जात आहेत. इतकंच नाही तर याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Beed Police Warning : जातीय रंग देणाऱ्यांवर कडक कारवाई करणार
या अशा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन त्यातून सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुहे दाखल करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
तरुणांच्या टोळक्याची शिवराज दिवटेला मारहाण
बीड जिल्ह्यातल्या जलालपूर भागात एका शिवराज दिवटे या तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जलालपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात शिवराज दिवटे नावाच्या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाण झालेल्या तरूणावर अंबाजोगाई शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
समाधान मुंडेंकडूनही गुन्हा दाखल
बीडमधील परळीत समाधान मुंडे मारहाण प्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळेसह इतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी आहे. मात्र समाधानलाच मारहाण झाल्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीतील जलालपूर भागात समाधान मुंडेला मारहाण झाल्याची तक्रार समाधान मुंडेच्या आईने केली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडेला सात ते आठ जणांनी लाथा बुक्क्या आणि बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलिस करत आहेत.
ही बातमी वाचा: