Beed News: बीडच्या परळीमध्ये एक नवाच प्रकार समोर आलाय. खासगी ग्राहकांच्या नावे असलेल्या वीज बिलाची रक्कम नगर परिषदेच्या नावावर टाकण्यात आली आणि ती वसूल देखील करण्यात आलीय. यामध्ये महावितरण व नगरपालिकेचे काही कर्मचारी संगनमत करत लाखो रुपयांचा अपहार करत असल्याची तक्रार ब्रह्मदेव चाटे या सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात आलीय. (Parli) यानंतर खडबडून जागे झालेल्या महावितरण विभागाने आता यावर विभागीय चौकशी समिती नियुक्त केली असून येत्या 8 दिवसांमध्ये या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे.अशा पद्धतीने खासगी ग्राहकांची बिले नगरपालिकेच्या नावावर टाकून लाखो रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आता परळीत होत आहे. (Beed Mahavitaran Scam)

खासगी विजबिलांची रक्कम नगरपरिषदेच्या नावावर

परळी शहरात वीजबिल घोटाळ्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात खासगी ग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम थेट नगरपरिषदेच्या नावावर टाकण्यात आल्याची माहिती असून, यामध्ये महावितरण आणि नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात लाखो रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटे यांनी केली आहे. ब्रह्मदेव चाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही खासगी ग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम त्यांच्याच नावे न भरता नगरपरिषदेच्या खात्यात भरली गेली.

विशेष म्हणजे ही रक्कम वसूलही करण्यात आली असून, ही योजना संगनमताने राबवण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येतो. याबाबतची लेखी तक्रार प्राप्त होताच महावितरण विभागाने तातडीने हालचाली करत विभागीय स्तरावर चौकशी समिती नियुक्त केली आहे. आठ दिवसांच्या आत समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होणार असल्याचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले.

दहशत पसरवणाऱ्या व्हिडिओवर चाप बसणार

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ होत असल्याचं चित्र आहे. विशेषतः सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही भागांमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करून समाज माध्यमावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. या व्हिडिओंमधून समाजात दहशतीचं वातावरण तयार होत असल्याने पोलिसांनी आता अशा कृतींविरोधात थेट कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे..