Beed News : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र बीड जिल्ह्यातील वास्तव मात्र धक्कादायक आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ तर मिळतोय, पण तो जीव मुठीत धरून! कारण जिल्ह्यातील तब्बल 592 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असून त्याच खोल्यांमध्ये मुलांना बसवून शिक्षण दिलं जात आहे.
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 2474 शाळा आहेत, त्यापैकी 2415 प्राथमिक तर 49 माध्यमिक शाळा आहेत. यातील 11 तालुक्यांतील 349 शाळांमध्ये 592 वर्गखोल्या मोडकळीस आल्याचं स्पष्ट झालं आहे. काही शाळांमध्ये तर परिस्थिती इतकी बिकट आहे की खबरदारी म्हणून झाडांखाली वर्ग भरवले जात आहेत. या धोकादायक वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, तर पालकांनीही वेळोवेळी आवाज उठवला. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. यामुळे संतप्त पालक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इव्हेंट्स न करता मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी निधी द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह पालकांनी केली आहे.
पाहणी केल्यानंतर निर्णय घेऊ
या संपूर्ण प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी सरकारी उत्तर दिले. ज्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करायची की नव्याने उभारणी करायची? याबाबत पाहणी केल्यानंतर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनी दिली आहे.
मोडकळीस आलेल्या शाळा खालीलप्रमाणे
आष्टी तालुका 80 शाळांमधील 119 वर्गखोल्या, अंबेजोगाई तालुक्यातील 16 शाळांमधील 30 वर्गखोल्या, बीड तालुक्यातील 28 शाळांमधील 37 वर्गखोल्या, धारूर तालुक्यातील 17 शाळांमधील 30 वर्गखोल्या, केज तालुक्यातील 19 शाळांमधील 22 वर्गखोल्या, गेवराई तालुक्यातील 62 शाळांमधील 125 वर्गखोल्या, माजलगाव तालुक्यातील 13 शाळांमधील 26 वर्गखोल्या, परळी तालुक्यातील 46 शाळांमधील 88 वर्गखोल्या, पाटोदा तालुक्यातील 31 शाळांमधील 40 वर्गखोल्या, शिरूर तालुक्यातील 24 शाळांमधील 32 वर्गखोल्या, वडवणी तालुक्यातील 13 शाळांमधील 43 वर्गखोल्या, अशा एकूण 349 शाळांमधील 592 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असून त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI