Beed News : बीड (Beed) जिल्ह्यात अमला येथे एका धक्कादायक प्रकार आला असून, बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी धारूर येथे घडली. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देतांना विचार करण्याची गरज आहे. अनिकेत सोळंके असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, अमला येथील बाळासाहेब सोळंके हे कामानिमित्त ते स्वतः मुंबईला असतात. मात्र, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धारूर येथे भाडेतत्वावर घर घेऊन राहतात. तर बाळासाहेब हे पनवेल येथील बस आगारात कार्यरत असून, त्यांचा सात वर्षांचा मुलगा अनिकेत सोळंके हा धारूर येथील जनता प्राथमिक विद्यालय येथे दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, 30 जुलै रोजी अनिकेत हा बंद पडलेला मोबाइल हातात घेऊन कॉटवर खेळत होता. मात्र, खेळत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला. त्यामध्ये अनिकेतचं तोंड भाजून निघाले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. तर बाजूलाच असलेल्या कपड्यालाही यामुळे आग ही लागली होती.
अनिकेत बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असतानाच अचानक झालेल्या स्फोटचा जोरदार आवाज आला. त्याच्या आईने आवाज ऐकून तत्काळ मुलाला बाजूला काढून आग विझविली. मुलगा अनिकेत याला धारूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. या अपघातामध्ये अनिकेतचे तोंड चांगलेच भाजले आहे. विशेष म्हणजे, अनिकेतची आई घरी होती म्हणून मोठा अनर्थ टळला आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
अंगावर गेट पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू...
दुसऱ्या एका घटनेत उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात घराचे गेट अंगावर पडल्याने पाचवर्षीय मुलगा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तेर येथील अंगणवाडीत शिकणारा अरफत इरफान मुलानी (वय 5 वर्ष) हा बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत होता. खेळ खेळत असताना त्याने गेट उघडले असता अंदाजे तीनशे ते चारशे किलो वजनाचे हे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडले. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नातेवाइकांनी त्यास तातडीने उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर, प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यास धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या: