बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं देखील सुरु करण्यात आली आहेत. त्यातच आरक्षणासाठी आमदार खासदारांच्या राजीनाम्याचं सत्र सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आलीये. बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिलाय. 


याआधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच आता भाजप आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झालं तर सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण केली जातेय. 


लक्ष्मण पवारांनी राजीनाम्याच्या पत्रात काय म्हटलं? 


लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'


राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेंचं आवाहन


हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना म्हटलं की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल.  राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही. 


हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा


हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला. हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.