बीड : सोमवारी गेवराईमध्ये झालेल्या राड्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणाऱ्या लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं असून हाके हे जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी परत गेले. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्यापासून पोलिसांनी रोखलं. गेवराई तालुक्यातील नागझरी गावाजवळ हाकेना रोखण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांना रोखल्याची माहिती आहे.
लक्ष्मण हाके जालन्यामध्ये
सोमवारी गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि या नोटिशीला उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईकडे निघाले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेवराई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे थांबवलं. लक्ष्मण हाके पोलिसांच्या विनंतीनंतर सध्या जालन्यातील वडीगोद्री येथे परतले.
बीडमध्ये जमावबंदीचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी 26 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.
लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल
बीडच्या गेवराईत सोमवारी झालेल्या राड्याप्रकरणी लक्ष्मण हाकेंवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हाकेंसह त्यांच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी हाके यांनी पोलिसांवर टीका केली.
वडीगोद्रीत बंदोबस्त वाढवण्यात आला
बीड येथील जमाबंदीच्या आदेशानंतर अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा आणि ओबीसी उपोषण आणि आंदोलन झालेल्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: