Beed Election news: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed Election) जिल्ह्यातील सहा नगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण 45 मतदान केंद्रे (Polling Stations) संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीत देखील बीडमधील काही मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते. यानंतर आता नगरपालिका निवडणुकीच्या (Election 2025) पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलीस (Police) प्रशासनाने पाहणी करून या केंद्रांची माहिती घेतली आहे.
Beed Election news: बीडमधील 45 मतदान केंद्रे संवेदनशील
बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्रात असून त्यांची संख्या 17 आहे. त्या खालोखाल माजलगावमध्ये 11 आणि परळीतही 11 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. बीड शहर पालिकेसाठी सहा केंद्रे संवेदनशील आहेत.
विशेष म्हणजे, धारूर आणि गेवराई नगरपालिका क्षेत्रांमध्ये शांततापूर्ण वातावरणामुळे एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या सर्व 45 संवेदनशील केंद्रांवर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली आहे.
Beed Election news: सहा नगरपालिकेसाठी 434 मतदान केंद्र
जिल्ह्यात 434 मतदान केंद्रे आहेत. यात बीड 179, परळी 88, अंबाजोगाई 69, माजलगाव 45, गेवराई 31 आणि धारूरमधील 22 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
Beed Election news: मतदानाच्या दिवशी बीडमधील सहा ठिकाणचे आठवडी बाजार राहणार बंद
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जारी केले आहेत. बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी आणि अंबाजोगाई या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांनी देखील या दिवशी बाजार बंद ठेवण्यास किंवा पुढे ढकलण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार "द मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862" च्या कलम 5 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी आणि अंबाजोगाई येथे भरणारे आठवडी बाजार 2 डिसेंबरला पूर्णपणे बंद राहतील.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा