बीड: मागील सहा महिन्यांपासून बीड जिल्हाकारागृह (Beed News) सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत आहे. याच कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आहे. या कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत.(Beed News) 

Continues below advertisement

कराडला जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सर्वात आधी झाला. याच दरम्यान बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी आणि देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आमने सामने आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपींची हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली. आता याच कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे अंमली पदार्थ वाटपावरून वाद झाला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सिनेस्टाईल पद्धतीने जेल बाहेरून एका रबरी बॉलमध्ये अंमली पदार्थ टाकून तो जेलमध्ये फेकण्यात आला आणि याच बॉलमधील अंमली पदार्थ घेण्यावरून वाद झाला. हाच वाद सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील धमकावण्यात आले. बाहेरून अंमली पदार्थ पुरविणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

वाल्मीक कराड पैशाच्या जोरावर आणि दहशतीच्या जोरावर कारागृह चालवत आहे. त्यामुळे बीड कारागृहातून काढून कराडला गडचिरोलीच्या कारागृहात पाठवावे अशी मागणी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी केली. सिंडिकेट चालविणारा माणूस हा बीडसारख्या छोट्या कारागृहात आहे. त्यामुळे कराडची जेल बदली का होत नाही? असा सवाल देखील बांगर यांनी उपस्थित केला. तर सतीश भोसले उर्फ खोक्याला देखील बाहेरील कारागृहात हलवले पाहिजे. मोठ-मोठ्या कारागृहात अशा गोष्टी होत असतात. मात्र बीड कारागृहात या गोष्टी पहिल्यांदाच होत असून गुन्हेगारीचा बादशाह हे सर्व घडवून आणत असल्याचा थेट आरोप बांगर यांनी यावेळी केला.

Continues below advertisement

जेल प्रशासनावर आरोप झाल्यानंतर तत्कालीन कारागृह अधीक्षकांची बदली देखील करण्यात आली. त्यांच्या जागी पेट्रस गायकवाड यांची नियुक्ती झाली. मात्र हे अधिकारी देखील वादाच्या भोवऱ्या सापडले आहेत. बीड कारागृहाची 162 कैद्यांची क्षमता आहे. मात्र या कारागृहात दुप्पट कैदी आहेत. त्यामुळे या सर्व बाबी समोर आल्यानं यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

 खोक्याची संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात रवानगी 

बीड जिल्हा कारागृहात बेकायदेशीर रित्या गांजा आणत त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले आहे. गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या चौघांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे. तत्पूर्वीच कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला हरसूल कारागृहात हलवले आहे.