Beed Crime : बीड जिल्ह्यात (Beed News) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोली (Higoli) जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जवळा बाजारच्या बळीराम सावंत याचे पैशाच्या व्यवहारातून धारूर तालुक्यातील एका महिलेसह दोघांनी अपहरण केले होते. ते बळीराम सावंत या व्यक्तीला घेऊन एका कारमधून धारूरकडे जात असताना तेलगाव येथे दिंद्रुड पोलिसांच्या पथकाने सदर कार स्थानिक नागरिकांच्या मदतीने थांबवत बळीराम सावंत याची सुटका केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बळीराम सावंत यांचा पैशाच्या व्यवहारातून धारूर तालुक्यातील नागराबाई तोंडे या महिलेबरोबर काही वाद झाला होता. या महिलेच्या सांगण्यावरून नामदेव घोळवे आणि बाबुराव बडे या दोघांनी मिळून बळीराम सावंत याचे अपहरण केले. ते सावंत यांना कारमधून धारूरकडे घेऊन जात होते.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडवली कार

दरम्यान, तेलगाव परिसरात दिंद्रुड पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे रस्त्यावर नाकाबंदी केली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयित कार थांबवली आणि तिची तपासणी केली असता, बळीराम सावंत हे वाहनात आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांची सुरक्षित सुटका केली. याप्रकरणी नागराबाई तोंडे, नामदेव घोळवे आणि बाबुराव बडे या तिघांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.   

तीन जिल्ह्यातून चोरलेल्या सात दुचाकीसह एक जण ताब्यात 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमधून सात दुचाकी चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B.) पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बीड जिल्ह्यातील तळेगाव येथे करण्यात आली असून आरोपीकडून एकूण सहा लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शेख इलियास शेख गफार (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चोरलेल्या दुचाकी तळेगाव परिसरात विक्री करण्याच्या तयारीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. आरोपीकडे चोरीच्या सात दुचाकी सापडल्या असून त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून चोरल्याचे उघड झाले आहे. चोरलेल्या दुचाकींची एकूण बाजारभाव किंमत सुमारे सहा लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा 

आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या