Beed Crime News बीड: बीडच्या अंबाजोगाईत हवेत गोळीबार (Firing In Beed) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता? यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा कायम चर्चेत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तर काल (16 जानेवारी) आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता बीडच्या अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
बीडमध्ये असलेल्या अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात आज दुपारी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. मोरेवाडी परिसरात नेमकं काय घडलं?, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जमावाचा हल्ला; आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू-
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. अजय भोसले आणि भरत भोसले असे मयताचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. यातील लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला. आणि ही घटना घडली आहे. हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला? हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे.