Beed Crime News : पत्नी पतीच्या वादानंतर माहेरी आलेल्या पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांनी जावयाला सासरवाडीत बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या (Beed) औरंगपूर येथे समोर आली आहे. मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सांगत जावयाला बोलवण्यात आले, त्यानंतर झालेल्या वादातून जावयाला मारहाण करण्यात आली आहे. शेवटी प्रकरण पोलिसात गेल्याने या प्रकरणात जावयाच्या तक्रारीवरुन सासू, सासरे, पत्नी व मेहुण्याविरोधात युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्याताल रांजणी येथील अमित सोनपाखरे आणि त्यांच्या पत्नी प्रगती सोनपारखे यांचे भांडण झाले होते. वाद विकोपाला गेल्याने प्रगती या माहेरी म्हणजेच बीडच्या औरंगपूर येथे आल्या होत्या. दरम्यान काही दिवसांनी मुलगी आजारी असल्याचे कारण देऊन त्यांनी पती अमित सोनपाखरे यांना औरंगपूरला बोलावून घेतले. तर मुलीगी आजारी असल्याची माहिती मिळताच अमित हे तात्काळ सासुरवाडीत आले. तर औरंगपूरला आलेल्या अमित यांचे सासऱ्यासोबत वाद झाला. या वादावरुन जावई अमित यांना सासरा आणि मेहुण्याने मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले असून, याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन सासू, सासरे, पत्नी व मेहुण्याविरोधात युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.


13 जुलै रोजी प्रगती सोनपाखरे यांनी पती अमित सोनपाखरे यांना फोनवरुन मुलगी आजारी असल्याचे सांगितले. त्यामुळे अमित गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सासरवाडीला गेले. अमितच्या चुलत्यांनी सून प्रगतीला फोनवरुन बोलण्याची विनंती केली. परंतु, प्रगती यांनी बोलण्यास नकार दिला. या कारणावरुन सासरे बाळू तुकाराम जोगदंड यांनी अमितच्या चुलत्याला शिवीगाळ केली. यावरुन जावई आणि सासऱ्यात वाद सुरु झाला. दरम्यान सासऱ्याने मुलगा संजय जोगदंडला बोलावून घेत अमितला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच, सासू मालन जोगदंड आणि पत्नी प्रगती सोनपारखे यांनीही शिवीगाळ करुन अमितला लाथाबुक्क्याने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे, तक्रारीत म्हटले आहे. 


पोलिसात गुन्हा दाखल... 


सासरच्या मंडळीकडून मारहाण होत असल्याने अमितने तेथून पळ काढला आणि भावासोबत युसूफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतले. त्यानंतर अमितच्या भावांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालय दाखल केले. तर अमित सोनपारखरे यांच्या तक्रारीवरुन सासू, सासरे, मेहुणा आणि पत्नीविरोधात युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विलास तुपारे करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : युवा सेनेच्या मराठवाडा सचिवावर भर चौकात प्राणघातक हल्ला; बीड जिल्ह्यात उडाली खळबळ