Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री वाढली आहे. त्यामुळे बीड पोलिसांनी या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. याच कारवाई दरम्यान अंबाजोगाई येथील वाण नदीपात्रात 15 गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई करत, साडेपाच लाखांचा मुद्देजाल जप्त केला आहे. तर, हजारो लिटर रसायन नष्ट केला आहे. विशेष म्हणजे दारूची वाहतूक करण्यासाठी आरोपींकडून चक्क घोड्यांचा वापर केला जात होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरालगतच्या वाणनदीपत्रातील 15 दारूभट्ट्यांवर छापे मारत कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी दोन घोड्यांसह एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दारू बनविताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, तिघे फरार झाले आहेत. यावेळी 10  हजार लीटर रसायन, शेकडो लीटर दारू नष्ट करण्यात आले आहे.


बीडच्या अंबाजोगाई लगतच्या वाण नदीच्या पात्रात अनेक गावठी दारूभट्टया सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी दारू तयार करायची आणि घोड्यांवरून त्याची वाहतूक करून शहरात आणून विकण्याचा अवैध धंदा सातत्याने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवारी सकाळीच वाण नदीपात्रात छापेमारी सुरू केली.ज्यात तब्बल 15 दारूभट्ट्यांवर उध्वस्त करण्यात आल्या. दरम्यान यावेळी, पोलिसांना उस्मान महम्मद गवळी (रा.गवळीपुरा, अंबाजोगाई) हा दारू करताना आढळून आला, तर हसन लाला चौधरी, मदार बुऱ्हाण चौधरी, पाशा सत्तार चौधरी (सर्व रा.गवळीपुरा, अंबाजोगाई) हे हातभट्टीची तयार दारू घेऊन जात असताना घोड्यावरून उतरून पळून गेले.


साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त!


पोलिसांनी केलेल्या कारवाईत 15 दारुभट्ट्यांतील 50 लोखंडी पिंपांतील दारू तयार करण्याचे 10 हजार लीटर रसायन, 110 लीटर तयार दारू, 308 किलो गूळ, मोबाइल, तीन घोडे, इतर साहित्य असा एकूण 5 लाख 52 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रसायन आणि तयार दारू नष्ट केली आहे. या प्रकरणी चार आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


यांनी केली कारवाई!


ही कारवाई अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालक कोळी, सहा. निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलिस कर्मचारी कल्याण देशमाने, महेश भागवत, बळीराम बासर, नाना राऊत, अनिल बिक्कड, कल्याण सोनवणे, उत्तरेश्वर केदार, स्वप्निल शिनगारे, कुलदीप खंदारे, महेश कोकाटे, राहुल भोसले, बापू राऊत यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : आधी गांधीगिरी आंदोलन, आता थेट तोडफोड; खड्ड्यावरुन बीड शहरातील मनसे आक्रमक