बीड: जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शिताफीनं त्याला अटक केली आहे. बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. मात्र, पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे.

विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जन्मठेप झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते. मात्र, विठ्ठलचा याला विरोध होता. यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने 2014 मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राण घातक हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता.या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. 

नेमकं काय घडलं होतं?

आरोपीने त्याच्या बहिणीच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे बहिणीने विष घेतले. ती हॉस्पिटलमध्ये भरती होती, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी आरोपीने बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर थोडक्यात बचावला. आरोपी पत्नीला भेटायला एमआयडीसी भागात आला होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. बीड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ही कामगिरी केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आरोपीने जे कृत्य केले, ते अत्यंत घृणास्पद होते. पोलिसांनी त्याला अटक करून योग्य कारवाई केली आहे.

7 वर्षांपासून फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल 7 वर्षांपासून फरार होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.