बीड: बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली? असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीत या कुटुंबातील सदस्य जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंबातील शारदा ढोबळे यांचे जमिनीच्या वादातून शेजारील नरवडे कुटुंबाशी भांडण झाले आणि याच भांडणाची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यात गाडी आडवी लावून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी आहेत. दरम्यान या प्रकरणाची दाखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप पसार आहेत.
मारहाण झालेल्या तक्रारदाराने दिली घटनेची माहिती
आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. आम्ही ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांनी आम्ही घराकडे परतत असताना 15-16 जणांनी आमचा रस्ता आडवला आणि मारहाण केली. त्यांनी पुलावरती आमच्यासमोर गाडी आडवी घातली. आम्ही आमच्या गाडीच्या काचा वरती घेतलेल्या होत्या. त्या काचा उघडल्या नाहीत म्हणून त्यांनी लोखंडी रॉडने आणि लाकडी दांडक्यांनी आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. गाडीच्या खाली ये म्हणून गाडीवर हल्ला केला. त्यानंतर मला सात ते आठ जणांनी चार ते पाच लाकडी फावड्याचे रॉड वापरून मारहाण केली. ते आम्हाला तिथे जीवे मारण्यासाठीच आले होते, असंही यावेळी तक्रारदाराने सांगितलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी जाताना आम्हाला जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे. मला फार वेदना होत आहेत. त्या मारहाण करणाऱ्यामध्ये आमचा एक नातेवाईक होता. त्यांना देखील आम्ही मारू नका म्हटलं होतं, मात्र, त्यांनी देखील मारहाण केली. दिवसा अशी मारहाण केली जाते आहे. कोणी थांबलं नसतं तर त्यांनी माझा जीवच घेतला असता. तिथे खूप लोक गोळा झाले त्यामुळे ते मारहाण करणारे पळून गेले. दोन ते तीन वाजल्यापासून ते आमचा पाठलाग करत होते. आम्ही पोलिस स्टेशलना तक्रार द्यायला गेलो, तेव्हापासून ते आमचा पाठलाग करत होते. माझ्या आईला देखील त्यांनी मारहाण केली आहे, तीला लोखंडी रॉड आणि लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली. त्यांनी तोंडाला रूमाल बांधले होते, असंही तक्रारदाराने सांगितलं आहे.