Beed Accident: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या अपघातात स्वाराती रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली चिरडून विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय 55, मूळ गाव केज) यांचा दुर्दैवी अंत झाला. सरवदे या गेली 35 वर्षे अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
मंगळवारी रोजच्या कामावर जाताना मोरेवाडी बसस्थानकाजवळ ही घटना घडली. बसमधून उतरत असतानाच चालकाने वाहन पुढे घेतले आणि त्या थेट चाकाखाली आल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी सकाळी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ दुर्दैवी अपघात झाला. स्वाराती रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय 55) या रोजच्या प्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. त्या बसने मोरेवाडी स्थानकापर्यंत प्रवास करून उतरायला लागल्या, मात्र नेमकं त्याचवेळी बस चालकाने वाहन पुढे घेतले. चालकाच्या लक्षात आलं नाही की त्या खाली उतरल्या आहेत. परिणामी सरवदे या थेट बसच्या चाकाखाली आल्या. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून रुग्णालयातील सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सहकाऱ्यांनी सरवदे या जबाबदार व कष्टाळू कर्मचारी होत्या, त्यांचे असे अचानक जाणे हा मोठा धक्का असल्याचे सांगितले. कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी बस चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेला चालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अपघाताची नोंद करण्यात आली
दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.अलीकडच्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. केवळ तीन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडून ठार केले होते. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान प्राण गेला होता. आता अंबाजोगाईतील नव्या घटनेमुळे जिल्ह्यातील रस्ते सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.