मुंबई : धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे भाऊ-बहीण एकत्र आल्यानेच महायुती आणि विरोधी आमदारांनी धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्याची सुपारी घेतली आणि एक सामाजिक कार्यकर्तीला कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. या हत्याकांडातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहे. पण या प्रकरणात त्यांचे राजकारण संपवण्यासाठी पद्धतशीरपणे आरोप करण्यात येत असल्याचं मिटकरी म्हणाले.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड हा त्या संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सुरेश धस यांना मंत्रिपद हवं होतं. पण त्यांना मंत्रिपद न मिळता ते मुंडे बहीण-भावाला मिळाल्याने त्यांच्या पोटात दुखतंय. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात टीका करण्याचं काम सुरू केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. बीड प्रकरणात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय. हे काम भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केलं जातंय. यामागे संजय राऊत असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला.
अंजली दमानिया यांच्यावर मिटकरींचा रोख
अमोल मिटकरी यांनी नाव न घेता अंजली दमानिया यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्याचा आरोप मिटकरी यांनी यांनी केला.
काय म्हणालेत अमोल मिटकरी?
केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत
संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादांना टार्गेट करणे सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे, ही धनंजय मुंडेंची सुरुवातपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत.
संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मूक मोर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण होत आहेत. देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपींना अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
ही बातमी वाचा: