बीड: बीडमधील सरपंच संतोष गायकवाड यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या बीडमधील प्रकरणावरुन आणि वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना वाल्मीक कराडला धनंजय मुंडेनी पोलिसांकडे सुपूर्द करावंं, असं म्हटलं आहे.
मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसतात त्याचवेळी मी 28 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही या घटनेचा कधीच राजकारण केले नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत संदीप क्षीरसागर?
एबीपी माझाशी बोलताना संदीप क्षीरसागर ही घटना घडल्यानंतर मी गावात गेलो, त्यावेळी गावकऱ्यांनी आणि पीडित कुटुंबांनी मला याबाबत माहिती देताना या प्रकरणातील सूत्रधाराचं नाव घेतलं, त्याचबरोबर त्यांनी त्यांची दहशत कशी आहे त्याची माहिती दिली ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्यामध्ये रोष देखील होता आणि ते घाबरलेले देखील होते. मी जेव्हा त्यांना सांगितलं, मी तुमच्यासोबत आहे. आपण या प्रकरणातील वाल्मीक कराड यांना कारवाई करू. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला त्यांचा एवढा त्रास झालाय की आम्ही पोलीस स्टेशन देखील जाळून टाकला आम्हाला एवढा त्रास झाला आहे. अधिवेशनात देखील हा विषय मांडू असे त्यांना सांगितले होते. हा विषय जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने मांडला, सभागृहात आम्ही या प्रकरणाचे कसलेही राजकारण केले नाही सत्ताधारी पक्षातील आमदारांशी याबाबत बोलणं झालं, त्यांनी देखील याबाबत प्रश्न मांडले. राजकारणामध्ये वैर होतात आपण समजू शकतो. मात्र ही घटना घडली आणि ज्या प्रकारे घडली ते भयानक होतं. लोकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं होतं की त्यांना क्रूरपणे मारताना या घटनेतील सूत्रधार वाल्मीक कराड ही घटना व्हिडिओ कॉल वर पाहत होता अशा घटना चित्रपटांमध्ये देखील होत नाहीत, असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
अधिवेशन संपल्यानंतर नवीन एसपी यांनी चार्ज घेतला. लोक थोड्याफार प्रमाणात समाधानी आहेत. मात्र या प्रकरणातील सूत्रधार वाल्मीक कराडला अटक केली नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल असं नागरिक सांगतात. धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं ते त्यांच्या निकटवर्तीय आहेत, कराडला पोलिसांकडे सोपवावं त्यांची नैतिकता आहे. एकीकडे म्हणायचं त्यांना फाशीवर चढवा जिल्हा सांगतोय तो मास्टरमाइंड आहे, असंही पुढे संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. धनंजय मुंडे म्हणतात मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय यावर उत्तर देताना संदीप क्षीरसागर म्हणाले, याच्यामध्ये काय राजकारण आहे. जेव्हा आम्ही बोलत होतो त्याबाबतची वस्तुस्थिती देखील सत्ताधारी पक्षातील नेत्यांना माहिती आहे, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.