बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जात आहे. दरम्यान, प्रकरण आता निवडणूक आयोगात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मात्र, असे असतानाच अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार असल्याचा दावा त्यांच्याच गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला आहे. एवढंच नाही तर, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार असल्याचं पटेल म्हणाले. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 


शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार गटाची देखील बीडमध्ये रविवारी (27 ऑगस्ट) जाहीर सभा झाली. यावेळी सभेत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. तर, आपल्या भाषणातून काही नेत्यांनी राष्ट्रवादीमधील बंडखोरीवर थेट भाष्य केले. दम्यान याचवेळी प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपले मत मांडले. "लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वाना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाच चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत आहे. पण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे."


सर्वांनी मिळून सामूहिक निर्णय घेतला


"राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही आणि अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. काही लोक म्हणतात की, पक्षात फूट नाही. हेच आम्ही देखील म्हणतो की पक्षात फूट नाहीच. उलट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. अनेक अशा घडामोडी होत असतात. त्यामुळे आयुष्यात कधी महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. दरम्यान, असाच आम्ही सर्वांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.


शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम....


दरम्यान राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून सुरु असून, आता कायदेशीर लढाई देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहेत. तसेच निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhagan Bhujbal Beed Speech : कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे भुजबळांवर भाषण आटोपतं घेण्याची वेळ, बीडमधील सभेत नेमकं काय घडलं?