बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जयदत्त क्षीरसागर (jaydatta kshirsagar) यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी आपल्या काकांकडे अजित पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचा निर्णय होत नसल्याने अखेर योग्य योगेश क्षीरसागर यांनी आपला निर्णय स्वतः घेतला आहे. पण, याचवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी त्यांच्याकडे असलेल्या विविध संस्थांच्या सभासदाची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या राजकीय पक्षाची अवस्था म्हणजे 800 खिडक्या आणि 900 दारं अशी झाली आहे. त्यामुळे हे गढूळ वातावरण शांत झाल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. आतापर्यंत रक्ताचे नाते टिकवले पण आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत.  


गेल्या काही वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राजकारणात सक्रिय असलेले त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण, जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापही आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, त्यांनी बोलावलेल्या समर्थकांच्या बैठकीत बोलताना, "आपण आपल्या भावासाठी आणि पुतण्यासाठी आतापर्यंत राजकारणात खूप काही केलं आहे. मात्र, आता इन्स्टंटचा जमाना असून, आपल्याला देखील भविष्यात आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला ताकद द्या, मी तुम्हाला शक्ती देतो," असं क्षीरसागर म्हणाले आहेत.


बीडमध्ये अजित पवार यांची रविवारी जाहीर सभा होती. या सभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सर्व मंत्री उपस्थित होते. तर, दुसरीकडे माजी मंत्री क्षीरसागर यांनी त्याच दिवशी संस्थांच्या सभासदाची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी लवकरच आपण आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितल्याने, जयदत्त क्षीरसागर आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 


बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचे मोठे योगदान आहे. क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय इतिहासाची सुरुवात सोनाजीराव क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी खासदार केशर काकू यांच्यापासून होते. तेव्हापासूनचा क्षीरसागर कुटुंबाचा राजकीय दबदबा आजही कायम आहे. मात्र, मागील काही दिवसांत क्षीरसागर कुटुंबात फुट पडली. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. ज्यात जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यात आता संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kshirsagar Family: बीडच्या राजकारणातील क्षीरसागर कुटुंब! एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा..