बीड : मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात यंदा चांगलीच चूरस वाढली असून निवडणुकीत जातीय रंग दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा समाजही निवडणूक प्रक्रियेत सक्रीय झाला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) महाविकास आघाडीच्या बंजरंग सोनवणेंचं आव्हान असून वंचित बहुजन आघाडीनेही येथील मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक तिरंगी होत असली तरीही थेट लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्यातच असणार आहे. मात्र, बीडमध्ये जरांगे पॅटर्नही लक्षवेधी आहे. त्यातच, जरांगे यांनी मराठा आरक्षण देणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. आता, वंचितच्या उमेदवाराने थेट स्टँप पेपरवरच आरक्षणाबाबत लिहून दिलं आहे.    


बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला असून सायंकाळी 6 वाजता येथील प्रचाराच्या तोफा तंडावणार आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडेंसाठी आज स्वत: उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परळीत सभा पार पडली. तर, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठी सभा होत आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. वंचितच्या उमेदवाराने थेट बॉण्ड पेपरवरच आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणारे शपथपत्र तयार केलं असून ते प्रसिद्धही करण्यात आले. विशेष म्हणजे हे शपथपत्र मनोज जरांगे पाटील यांना सादर करण्यात येणार असल्याचंही उमेदवाराने स्पष्ट केले आहे.


बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाबाबतच्या आरक्षणाची हमी थेट बॉण्डवर लिहून जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवार आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, त्याच्या पाठिशी मराठा समाजा उभा राहील असं म्हटलं होतं. त्यानंतर आता वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आपली भूमिका बॉण्डवर लिहून देत स्पष्ट केली. तसेच, हे शपथपत्र जरांगे पाटलांपर्यंत पोहोचविणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, बीडच्या निवडणुकीत नवाच ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आता, जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे शपथपत्र जरांगे स्वीकारतील का, मराठा समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी जाईल का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 


उमेदवाराचा घोड्यावरुन प्रचार
 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांनी घोड्यावरून प्रचार सुरू केल्याचं दिसून आलं. प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असून उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, एकूण 41 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्,र गणेश करंडे या अपक्ष उमेदवाराचा प्रचार सध्या बीडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 


हेही वाचा


राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात...


हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा