बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती येत्या १२ डिसेंबरला विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Gopinath Munde) स्वतः या सर्व उपक्रमात सहभागी होणार आहेत. १२ डिसेंबरला जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान तसेच रक्तदान, श्रमदान व अन्नदानही यादिवशी त्या करणार आहेत. दरम्यान, गोपिनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात न्या, त्यांना समर्पित असा दिवस साजरा करा असं आवाहन त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलं आहे.
यासंदर्भात पंकजा ंनी एक व्हिडिओ संदेश त्यांच्या सोशल मीडियावर जारी केला आहे, त्या म्हणाल्या, यादिवशी मी काय करणार आहे? याच्या बद्दल तुमच्या मनामध्ये खुप उत्सुकता असेल, मी आणि तुम्ही मिळुन जर कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये सुसूत्रता येते. मी आपल्या सर्वांना माझा दिनक्रम सांगेल त्याप्रमाणे जर आपण आपला दिनक्रम त्या दिवशी जोडला तर आपल्या कार्यक्रमामध्ये साम्य नकीच बघायला मिळेल. त्यादिवशी सकाळी उठल्यानंतर मी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करणार आहे. मुंडे साहेबांच्या विचारांच्या शतायुषी होण्यासाठी हे माझा प्रयत्न असेल. मुंडे साहेब शतायुषी व्हावे, आपले वडील दीर्घायुषी व्हावे असं प्रत्येक मुलीला वाटतं, आपला नेता मोठा व्हावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, मुंडे साहेबांच्या बाबतीत तसं घडलं नाही, का तर मुंडे साहेबांचे विचार हे तर शतायुषी किमान व्हावे त्याही पेक्षा मोठे व्हावे त्यासाठी मी ईश्वरला प्रार्थना करणार आहे. मुंडे साहेबांची जी विचारधारा होती त्याप्रमाणे प्रार्थना केवळ वैद्यनाथाला करुन भागणार नाही तर मी मस्जिदीत देखील जाणार आहे आणि तद्नंतर मी बौध्द विहारात देखील जाणार आहे. मुंडे साहेब हे सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांना हवहवंसं वाटणारं असं नेतृत्व होतं, त्यामुळे मुंडे साहेबांची प्रार्थना देखील सर्व धर्मांच्या, सर्व विचारांच्या लोकांच्या पध्दतीने झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे. त्यामुळे मी अशी प्रार्थना त्यादिवशी करणार आहे. त्यानंतर गोपीनाथगडावर जावुन मी मुंडे साहेबांचे दर्शन घेणार आहे. आणि मुंडे साहेबांना जेवढे पदार्थ आवडत होते त्या पदार्थाचं ताट तयार करुन तो नैवेद्य मी समाधीच्या तिथे दाखवून मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना आवाहन
मी तुम्हांला विनंती करते की, मुंडे साहेबांना समर्पित दिवस साजरा करताना अन्नदान, श्रमदान किंवा रक्तदान यापैकी कुठलं तरी दान आपण जरुर मुंडे साहेबांच्या नावाने करा, या सर्व उपक्रमांचा आपला व्हिडीओ, माहिती, बातम्या, फोटो हे सर्व आपण माझ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझ्याशी हॅशटॅग गोपीनाथगड असं वापरुन शेअर करा ज्याच्यामुळे आपले सगळे कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोंचतील आणि माझे सुध्दा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचतील असं पंकजा ंनी म्हटलं आहे.