Suresh Dhas on Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर चांदा ते बांदा अवघ्या  महाराष्ट्रामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. बीडमधील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाला सर्वाधिक वाचा फोडताना खंडणीखोर आणि संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराडवरची टीका सुरुच ठेवली आहे. बीड, परभणीनंतर रविवारी पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ काढण्यात आला आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. जनआक्रोश मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा खंडणीखोर वाल्मीक कराडवर आरोप केला. 


वाल्मिक कराडची 100 बँक खाती


वाल्मिक कराडची तब्बल 100 बँक खाती असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. त्याची चौकशी का केली जात नाही? अशी विचारणा धस यांनी केली. ऐरवी 50 बँक खाती असतील, तर ईडी लगेच मागे लागते, असा टोला सुद्धा सुरेश धस यांनी लगावला. दरम्यान, खंडणीसाठी 14 जून रोजी धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली होती, असा गौप्यस्फोटही  धस यांनी केला. 


तब्बल 17 मोबाईल नंबरचा वापर


दरम्यान वाल्मीक कराज आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी हे दोघे मिळून तब्बल 17 मोबाईल नंबर वापरत असल्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केला आहे. वाल्मीक कराड शरण आल्यानंतर नितीन कुलकर्णी फरार झाल्याचेही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना आणि सीआयडीच्या डीजींना नितीन कुलकर्णीला ताब्यात घेण्याचे आवाहन केलं. कोणी कोणाकडून किती पैसे घेतले या 17 मोबाईल नंबरच्या तपासणीमधून तुम्हाला माहिती मिळेल असेही ते म्हणाले. 


खंडणीसाठी मुंडेच्या बंगल्यावर बैठका 


धस यांनी सांगितले की, 14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. थेट मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने वाल्मीक कराडचा इगो दुखावला होता. त्यामुळे जोशीला त्याने खडसावलं.


त्यानंतर  19 जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमत दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच 50 लाख  द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना ५० लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या