बीड : अचानक बेपत्ता झालेला आडत व्यापारी बीडच्या धारुरमध्ये हातपाय बांधलेल्या गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारुती गायके असं या आडत व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यांना अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चोरीच्या उद्देशाने त्यांना मारहाण झाल्याची चर्चा आहे. या घटनेने धारुर परिसरातील व्यापारी भयभीत झाले असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.


आडत व्यापारी मारुती गायके सोमवारी (25 एप्रिल) रात्री हे खाजगी कामानिमित्त केज इथे गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत परत घरी परत न आल्याने कुटुंबियांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी केज रस्त्यावर शोध घेतला असता रात्री एकच्या सुमारास कासारी पाटीजवळ मारुती गायके यांची दुचाकी पडलेली दिसली. शोधाशोध केला असता काही अंतरावर हातपाय बांधलेल्या गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत मारुती गायके आढळून आले.


मारुती गायके यांच्या पाठीवर आणि मांडीवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आलं. त्यांना तात्काळ धारुर इथल्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे धारुर शहरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्याला चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे.


आडत व्यापारी मारुती गायके घरी परत आले नसल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी केज रस्त्यावर कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते शुद्धीत आलेले नाही. त्यामुळे मारहाण नेमकी कशामुळे झाली, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या कारणामुळेच याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता. पोलीस मंगळवारी सकाळीच अंबाजोगाई रुग्णालयाकडे पुढील तपासासाठी गेले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एस आटोळे यांनी दिली.


इतर बातम्या