Akola News Update : अकोला पोलीस मुख्यालय परिसरातील शासकीय निवासस्थानातून एका महिला पीएसआयची (पोलीस उपनिरीक्षक) सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरीला गेली आहे. सरिता कुवारे असं रिव्हॉल्वर चोरी झालेल्या महिला पोलीस पीएसआयचं नाव आहे. त्या शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.  
 
सरिता कुवारे या  21 ते 25 एप्रिलदरम्यान सुट्टीवर होत्या. यादरम्यान घर बंद असताना चोरट्यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरवर डल्ला मारला. याबाबत त्यांनी सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काडतूसांचे पाच राऊंडही चोरी गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. 


अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सरिता कुवारे या  21 ते 25 एप्रिल या कालावधीत सुट्टीवर गेल्या होत्या. सु्ट्टीवरून काल त्या घरी परतल्या नंतर त्यांना घरातील आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरीला गेल्याचं लक्षात आलं. यासंदर्भात त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कुवारे यांनी कोतवाली पोलिसांत सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, घरातील इतर कोणतंच साहित्य चोरट्यांनी लंपास केलेलं नाही.  


पोलीस मुख्यालय परिसर हा चोवीस तास पोलीस आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा राबता असलेला परिसर आहे. नेमकं त्याच परिसरातून एका पोलीस अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर चोरीला जाण्याची घटना अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेली रिव्हॉल्वर शोधण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. 


रिव्हॉल्वर हरवली की चोरीला गेली? 


मुळात ही रिव्हॉल्वर हरवली की चोरीला गेली यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस मुख्यालय परिसरातून एखाद्या अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर चोरी कशी होऊ शकते?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच फक्त रिल्हॉल्वरच कशी चोरी होते? घरातील इतर ऐवजाला चोरट्यांनी का हात लावला नाही? असा संशय निर्माण होत आहे. त्यामूळे कुवारे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर हरवली की?, चोरी गेली? असा प्रश्न विचारला उपस्थित केला जात आहे.