बीड: जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने गुन्हे दाखल झालेल्या 'जिजाऊ माँसाहेब' मल्टिस्टेटच्या (Beed Bank Scam Case) चेअरमन आणि इतर पदाधीकाऱ्यांच्या विरोधात एमपीआयडीखाली (MPID) कारवाईला सुरुवात झाली आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले असून आता हे अधिकारी संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊले उचलणार आहेत.
बीड जिल्ह्यातील 'जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटने ठिकठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी घेतल्या होत्या. मात्र सदर ठेवी परत करण्यात संस्थेला अपयश आले होते. त्यामुळे मल्टिस्टेटच्या विरोधात बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यातील बबन शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. फौजदारी कारवाईसोबतच या प्रकरणात एमपीआयडीखाली देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून, त्याचा लिलाव करण्यासाठी एमपीआयडी कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गृह विभागाला पाठविला होता. त्यानुसार आता राज्याच्या गृह विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून एमपीआयडी कायद्याखाली पुढील कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बीड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
प्रकरण नेमकं काय?
लोकांना जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या. बँकेच्या अध्यक्ष आणि त्यांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला.
जेव्हा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळी बँकेकडे ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यास पैसेच नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अशी उत्तरं देऊन धुडकावून लावलं जात होतं. पण सातत्यानं अशीच उत्तरं मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरुन बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे, त्यांचे पती बबन शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी सुनील वांढरे आणि बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणात अखेर पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांना अटक केली.
इतर महत्वाच्या बातम्या