Bangalore Crime: बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर (Rakesh Khedekar) याने त्याची पत्नी गौरी सांबरेकर (Gauri Sambarekar) हिची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर हे दोघेही मुंबईत राहणारे होते. दोन वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचे लग्न झाले होते. याचदरम्यान आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोन महिन्यापूर्वी दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बंगळुरु पोलिसांनी दोघांची समजूत घातली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद शीगेला पोचून राकेश खेडेकरने पत्नी गौरी वर चाकूने वार करत हत्या केली. आरोपी राकेश खेडेकरला अटक केली असून त्याने सदर हत्या प्रकरणाचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली, घरातील काही भांडीही गौरीने फेकली-
राकेश खेडेकर एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करत होता. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गोरी जॉबच्या शोधात होती. 26 मार्च 2025 च्या रात्री गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राकेश आणि गौरीमध्ये पु्न्हा वाद झाला. फ्लॅटचे डिपॉझिट आताच आपण भरले आहेत. ते परत मिळणार नाही. आधीच खूप खर्च झाला आहे, असं राकेशने गौरीला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौरीने चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली. तसेच घरातील काही भांडीही गौरीने फेकली. याचाच मनात राग धरुन राकेशने गौरीची हत्या केली.
हत्या केल्यानंतर गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले-
हत्या केल्यानंतर गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. येत असताना त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केल्या असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले.
आम्ही लग्नाला विरोध करत होतो-
मला असं कधी वाटलं नव्हतं सगळं इथंपर्यंत पोहोचेल. मात्र ते घडलं. त्यांचं रोजच भांडण होत होतं. ती कधीकधी वेड्यासारखी करायची. ती भांडणात अंगावर धावायची, तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर धावून जाऊन मारलं आहे. तिचा स्वभाव असा आहे हे माहिती होतं, म्हणून आम्ही आधीपासून लग्नाला विरोध करत होतो. मात्र, ते एकमेकांना सोडायला तयारचं नव्हते. चार वर्षे आम्ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध करत होतो. पण ते त्यांच्या निर्णयावरती ठाम होते. आम्ही एकमेकांसोबतच लग्न करू नाहीतर लग्नच करणार नाही असं दोघं म्हणत होते, असं गौरीचे पालक म्हणाले.