औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा स्वागत औरंगाबादची प्रसिद्ध अशा हिमरु शाल देऊन स्वागत केलं जाणार आहे, असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. नक्षीदार, रंगीबेरंगी आणि उबदार हिमरु शाल औरंगाबादच्या प्रमुख ओळखीपैकी एक. ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय त्यांना आज मुख्यमंत्री उत्तर देतील, असं दानवे यांनी नमूद केलं.


स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांना मुख्यमंत्री उत्तर देतील : अंबादास दानवे 
दरम्यान शिवसेनेची आजची सभा स्वाभिमान सभा असणार आहे, हिंदुत्वाचा हा स्वाभिमान असल्याचं आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय त्यांना आज मुख्यमंत्री उत्तर देतील. आपण शिवरायांचे वंशज आहोत. छत्रपती शिवराय सूरत लुटायला गेले होते आणि स्वराज्य मजबूत केलं होतं. पण आज आपल्याकडील काही लोक छत्रपतींचं नाव तर घेतात पण आपला महाराष्ट्र लुटून सूरतला द्यायची तयारी असते. त्यांनी सूरतेच्या दरबारी किंवा दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण ठेवला आहे. पण शिवसेनेने स्वाभिमान जपला आहे. हा स्वाभिमान हिंदुत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांना स्वाभिमान असतो, नसतो मला माहित नाही. बरेच लोक हिंदुत्त्वासाठी तडजोड करत असतात. शिवसेना सगळ्या स्थितीत स्वाभिमान 100 टक्के जपण्याचा प्रयत्न करत असते, असं दानवे म्हणाले.


'जनतेच्या मनात संभाजीनगर आहे'
या शहराचं नाव संभाजीनगर शिवसेनाप्रमुखांनी 9 मे 1988 रोजी केलेलं आहे. शिवसेनाप्रमुखांचा शब्द म्हणजे प्रमाण असतो. इथल्या जनतेने संभाजीनगर नावाचा स्वीकार केला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर हे नाव सरकारी कागदावर जरी नसलं तरी जनतेच्या मनात संभाजीनगर आहे, असं दानवे म्हणाले. 


पाणी प्रश्नावर दानवे काय म्हणाले?
सध्या औरंगाबादमधील पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. याविषय बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवला तर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आमचा सत्कार करण्याची गरज नाही. आमच्या नेतृत्वाचा सत्कार करायला आम्ही समर्थ आहोत. पाणी प्रश्‍नासाठी सगळ्यात मोठी 1680 कोटींच्या योजनेचं काम संभाजीनगरमध्ये सुरु आहे. हे काम सुरु झालेलं आहे, मात्र तातडीने लगेच हा प्रश्न सुटेल असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


तब्बल 15 अटी शर्तींसह मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला तब्बल 15 अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसंच, आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. 


सभेच्या मंचासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेच्या निमित्ताने आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे, सभेच्या स्टेजसमोर उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. शिवसेनेच्या सभेत पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत औरंगाबादचं नामांतर करत संभाजीनगर झाल्याची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. 


 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.