Jain Mandir Theft: राज्यभर गाजलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील (Jambasamarth Ram Temple Idol Theft Case) राम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणात गेल्या महिन्यात अखेर पोलिसांनी आरोपींचा शोध लावला असतानाच, आता औरंगाबादच्या कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून (Shri 1008 Chintamani Parsvanath Digambar Jain Mandir) सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली असल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात महिनाभरापूर्वीच मंदिर प्रशासनाने दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसविली होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास केली आहे. तर त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती बसविली. हुबेहुब दिसणारी मूर्ती बसवल्यानं मूर्तीची अदलाबदली नेमकी केव्हा झाली? हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र शनिवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचं लक्षात आल्यानंतर मूर्तीचं वजन आणि परीक्षण करण्यात आलं. तेव्हा मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली, विशेष म्हणजे मूळ सोन्याची मूर्ती दोन किलो 300 ग्राम वजनाची आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मूर्ती कधी बदलली कळलंच नाही
महिनाभरापूर्वीच मंदिर प्रशासनानं दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसविली होती. मात्र नियमित मंदिरात येणाऱ्या भाविकांना मूर्तीचा रंग फिकट पडल्याचं दिसून आल्यानं त्यांचा संशय बळावला. त्यातून त्यांनी मूर्ती बदलली गेल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर मूर्तीच वजन तपासलं असता सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, मूळ सोन्याची मूर्ती बदलून त्याजागी हुबेहूब दिसणारी मूर्ती बसवण्यात आल्यानं मूर्ती बदलल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी!
कचनेर येथे असलेल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. फक्त राज्याचं नाही तर देशभरातील जैन समाजातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. जैन समाजातील प्रसिद्ध मंदिरात कचनेरच्या मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलीस दल हादरलं आहे. तर घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. तर पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मूळ सोन्याची मूर्ती शोधण्याचे आवाहन असणार आहे.