बीड : ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया यांचे वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 2 वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.


राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनात राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले.

सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं  विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला.

  • डॉ. द्वारकादास लोहिया यांचा परिचय
    नाव - डॉ. द्वारकादास शालीग्राम लोहिया
    जन्म दिनांक : - 7  सप्टेंबर 1938
    शिक्षण - जी. सी.ए.एम. (मुंबई), हिंदी साहित्य विशारद
    संस्थेचे नाव - मानवलोक (मराठवाडा नवनिर्माण लोकायत)

  • विशेष कार्य
    मराठवाडा विकास आंदोलन 1972 चे दुष्काळ आंदोलन, अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. या शिवाय भ्रष्टाचार विरोधी मोहिम, दुष्काळी परिस्थितीत हाताला काम पोटाला दाम, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी, भ्रष्ट पोलिसांना नजराना कार्यक्रम इत्यादी प्रकारच्या कार्यात 1962 ते 1975 या काळात पुढाकार व नेतृत्व म्हणून अनेकदा तुरुंगवास. 1975 च्या आणीबाणीत 18 महिन्यांचा तुरुंगवास.