औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सिल्लोडच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पण ही सभा नियोजित ठिकाणी होणार नसून त्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांची 7 नोव्हेंबर रोजी होणारी सभा ही सिल्लोडच्या आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत होणार आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकाच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. सिल्लोड हा मतदारसंघ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या सभेची मोठी चर्चा सुरू झाली. त्यातच पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच कारण सांगत सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकात होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली. पण त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणाऱ्या सभेला मात्र परवानगी देण्यात आली होती.
तासाभरापूर्वी परवानगी नाकारलेल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. सिल्लोड मध्ये होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली असून ठिकाण मात्र बदलण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शहरातील महावीर चौकात परवानगी मागितली गेली होती. मात्र पोलिसांनी आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत आदित्य ठाकरे यांना सभा घेण्यास परवानगी दिली आहे. पण ठाकरे गटाची यावर अजून कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.
आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एकाच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहेत. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा घेण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आदित्य ठाकरे यांना महावीर चौकात सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सभेचे हे ठिकाण बदलून आंबेडकर चौकातल्या मोकळ्या जागेत या सभेला परवानगी दिली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेतो हे पाहावं लागेल.
राज्याचे मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामध्ये ते औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागली होती. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला होता.