रत्नागिरी : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यानंतर आता राज्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देखील याबाबत गांभीर्यानं विचार करत असून त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद देखील साधला आहे. दरम्यान, लॉकडाऊन हाच अंतिम उपाय असून त्याबाबत मुख्यमंत्री गंभीर असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचं लॉकडाऊनबाबत वेगळं मत आहे. पण, मुख्यमंत्री मात्र येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचा विचारले असता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधात जोरदार प्रहार केला आहे.
मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही. त्यांचा पहिला, मधला आणि शेवटचा उपाय हा लॉकडाऊनच आहे. ते लॉकडाऊनशिवाय काहीच बोलत नाही. त्यामुळे आता 'मातोश्रीचं नाव बदलून 'लॉकडाऊन' करा अशी टीका त्यांनी केली आहे. 'काही दिवसानंतर राज्यातील लोकं एकमेकांना खातील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. मुख्यमंत्र्यांना काही कळतं की नाही हेच मला कळत नाही. राज्यातील नागरिक भुकेनं मरतील. यांच्या एसओपी कोण तयार करतं? हेच कळत नाही. शिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांना काही कळतं की नाही? अशी टीका देखील यावेळी निलेश राणे यांनी केली. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'रत्नागिरी जिल्ह्यात देखील गंभीर परिस्थिती'
रत्नागिरी जिल्ह्यात देखील सध्या गंभीर परिस्थिती आहे. मंत्री उदय सामंत यांनी दोन हजारपेक्षा जास्त बेडस उपलब्ध असल्याची माहिती दिली. पण, ते बेड्स आहेत कुठं? जिल्ह्याला कोणी वाली नाही. पालकमंत्री येत नाहीत अशी स्थिती सध्या जिल्ह्याची आहे. सध्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सामान्य लोकांची यात काय चूक? त्यांनी या साऱ्या स्थितीत काय करावं? मेडिकल स्टाफ उपलब्ध नाही. तज्ञ्जांची कमी आहे. अशा वेळेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा कसा काय करू शकता? असा सवाल देखील यावेळी निलेश राणे यांनी केला. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा देखील नाही आहे. अशी सारी स्थिती असताना जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सुट्टीवर आहेत. भास्कर जाधव आले आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये काही तरी झालं. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी सुट्टीवर गेले. या साऱ्याकडे कुणाचं कसं लक्ष नाही? याबाबत कोण जाब विचारणार आहे की नाही? लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला? हा एक ऑर्गनाईज क्राईम आहे. या साऱ्यांना मोक्का लावला पाहिजे. याबाबत मी लवकरच एक लिटीगेशन फाईल करणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.