Aurangabad: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. ऐनवेळी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पेपर बारा वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता. मात्र यातून मार्ग काढू, तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.


मंत्र्यांची दखल... 


औरंगाबादमध्ये घडलेल्या या सर्व प्रकरणाची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. घडलेल्या सर्व घटनेचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबधित विभागाला देण्यात आले आहे. तसेच यात काही नियमबाह्य काही असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येणार असल्याचं सामंत म्हणाले. परीक्षा घेण्याची जवाबदारी विद्यापीठाची होती,मात्र आम्ही शासन म्हणून हात झटकणार नाही. त्यामुळे योग्य ती कारवाई केली जाईल असेही सामंत म्हणाले.  


परिक्षा केंद्र रद्द.. 


पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला आहे ते केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजयेंद्र काबरा महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा इतर महाविद्यालयात घेतली जाणार आहे. तसेच परीक्षेच्या गोंधळ प्रकरणी विद्यापीठ परीक्षा विभागाचे संचालक आणि केंद्र संचालकांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरु श्याम शिरसाठ यांनी दिली आहे. 


यामुळे उडाला गोंधळ... 


औरंगाबाद शहरातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात हा सर्व गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या सेंटरसाठी 900 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले होते. मात्र महाविद्यालयला फक्त 700 विद्यार्थ्यांची यादी देण्यात आली होती. त्यामुळे हा सर्व गोंधळ उडल्याचे समोर आले. तर या सर्व घटनेत विद्यापीठ प्रशासनाचा नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI