Hingoli News: आधीच जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला असतांना आता पुन्हा एकदा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 161 टक्के म्हणजेच 477 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
पुन्हा पावसाची हजेरी...
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. ओंढा,वसमत, सेनगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता .परंतु आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यातच कोवळ्या पिकात तुंबल्याने पिके सडण्याची भीती आहे.
हिंगोलीत 19 हजार शेतकऱ्यांचे नुकसान...
हिंगोली जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 477 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात 19 हजार 197 शेतकऱ्यांचे 15 हजार 944 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करायला सुरवात केली आहे.
Madhya Pradesh Bus Accident: इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून, 3 लाख 30 हजार 357 शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख 20 हजार 879 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर 261 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. परभणी जिल्ह्यात 1500 शेतकऱ्यांचे 1200 हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात 377 शेतकऱ्यांचे 50 हेक्टरचे नुकसान झाले असून, 205 हेक्टर खरडून गेली आहे.