Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांच्या याच निर्णयावरून भाजपचे नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवतच कराड यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जुन्या सरकारला जाता-जाता शहाणपण सुचले. पण औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर अजून झाले नसून, केंद्राच्या आदेशानंतरच नामांतर होणार आहे. त्यामुळे आम्हीच नामांतर करणार असल्याचा त्यांचा सूर यावेळी पाहायला मिळाला. 


काय म्हणाले कराड...


राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारनंतर भागवत कराड यांनी प्रथमच औरंगाबाद शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नामांतराच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना कराड म्हणाले की, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला असला तरी अजूनही शहराचे नाव संभाजीनगर झाले नाही. यासंबंधीची केंद्राने अधिसूचना काढल्यानंतर शहराचे अधिकृत नामांतर होईल. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीने काही केले नाही. मात्र त्यांना जाता-जाता शहाणपण सुचले. त्यामुळे शिवसेना केवळ श्रेयासाठी संभाजीनगरचा फायदा घेण्याचे प्रयत्न करीत असून अद्याप नामांतर झाले नाही, असे कराड म्हणाले. 


विधानसभेतही पडसाद...


औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून सुरु असलेल्या वादाचे पडसाद रविवारी विधानसभेतही पाहायला मिळाले. शहरांची नावे बदलून विकास होतो का? असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. नुसतं नाव बदलून काय सांगायचं आहे? शहरांची मुस्लीम नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. तर यावर उत्तर देतांना, मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला आमचा विरोध असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लीम आणि हिंदू असा भेदभाव नाही, असेही जाधव म्हणाले. 


तर आमची श्रद्धा असलेल्या संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्याचं नाव या शहराला असेल हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे संभाजीनगर नाव या शहराचं झालं पाहिजे ही आमची भावना आणि मागणी आहे, असं भाजप आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले.