Corona Fourth Wave: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात महराष्ट्रात हा आकडा अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदने ग्रामीण भागातील लसीकरण वाढवण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी कोरोनाचा तिसरा डोस घेणार नाही, त्यांचे जून महिन्याचे वेतन रोखण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक निलेश गटणे यांनी दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 14 टक्के नागरिकांनी आजपर्यंत एकही डोस घेतला नाही. दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 34 टक्के आहे. सुमारे साडेसहा लाख नागरिकांना लस देणे आहे. मात्र, नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत असून, आजघडीला जिल्ह्यात 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढ नयेत म्हणून लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
जिल्ह्यात 12 कर्मचारी...
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 12 हजार कर्मचारी आहेत. ज्यात जि.प.च्या शिक्षण विभागात सुमारे आठ हजार शिक्षक, आरोग्य विभागात 1 हजार कर्मचारी, पंचायत विभागात सुमारे 700 कर्मचारी, कृषी, बांधकाम, अर्थ विभाग, सामान्य प्रशासन आणि पशुसंवर्धन, समाजकल्याण अशा सर्व विभागात एकूण 12 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून संबोधले जाते.
रुग्ण संख्या वाढतेय...
औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. सोमवारी जिल्ह्यात 17 सक्रीय रुग्ण असल्याची नोंद झाली. तर काल दिवसभरातून एका रुग्णाची वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 824 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आकडा पाहिल्यास 29 लाख 95 हजार 943 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 22 लाख 82 हजार 957 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 78 हजार 745 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे एकूण सर्व मिळून लसीकरणाचा आकडा 53 लाख 57 645 वर पोहचला आहे.