Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला असतानाच भाजपाकडून आज (सोमवारी) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना समोर आली आहे. तर भाजपकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. निवडणुकींच्या आचारसंहितेच्या वेळेस फसवी योजना मंजूर करून राजकारण करणारे आज मोर्चा काढत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. याबाबत दानवे यांनी फेसबुक पोस्ट करून भाजपवर टीका केली आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज निघणाऱ्या मोर्च्यापूर्वी भाजपवर टीका करताना दानवे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस साहेब पाच वर्षे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद शहरासाठी आचारसंहितेच्या वेळेस फसवी पाणी योजना मंजूर करून राजकारण करणारे आज मोर्चा काढत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) दोन वेळेस महापौर आणि एक वेळेस उपमहापौर असताना पाणी योजनेसाठी काहीही न केलेले आज मोर्चा काढत आहेत. सिडको-हडकोसाठी असलेल्या एक्सप्रेस लाइन चे पाणी वळवणारे आज मोर्चा काढत आहेत. बापू घडामोडे 2016 मध्ये महापौर असताना, शहरात, राज्यात, केंद्रात गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना शहराच्या पाणी योजनेसाठी काहीही न केलेले आज मोर्चा काढत आहेत. आजीवन माजी उपमहापौर पदवी लावून शहरात फिरणारे आणि पाण्यासाठी काहीही न केलेले भाजपचे नेते फक्त राजकारण करण्यासाठी आज मोर्चा काढत आहेत. गेली 25 पेक्षा जास्त वर्षे शिवसेनेसोबत सत्ता उपभोगलेले शिवसेनेच्या जीवावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, इतर सभापती, नगरसेवक, इ.पदे घेतलेले पण आज मोर्चा काढत आहेत. त्यामुळे तुम्ही शहरात राजकारण करत राहा, आम्ही आमच्या नागरिकांसाठी समाजकारण करत राहू असे दानवे म्हणाले आहे.
असा निघणार मोर्चा...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. संध्याकाळी चार वाजता हा मोर्चा शहरातल्या पैठणगेट येथून निघणार असून महानगरपालिका कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. यावेळी भाजपचे खासदार,आमदार ,माजी नगरसेवक यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पोलिसांकडून मोर्च्याच्या पार्शवभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.