Aurangabad News: औरंगाबाद- पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाल्याची घटना समोर आली आहे. हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या दोन्ही तरुणांचा जगीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघात मृत्यू झालेले हे दोन्ही मित्र एकाच गावातील असून, लहानपणीचे वर्गमित्र असल्याचे सुद्धा समोर आले आहे. आदीत्य रामनाथ सुंब (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) आणि यश उर्फ नयन भाऊसाहेब शेंगुळे (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) असे या दोन्ही तरुणांचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आदीत्य आणि यश हे मोटारसायकल क्रमांक एम.एच 20 ई.एक्स 6048 वरून औरंगाबादकडे महाविद्यालयत जात होते. दरम्यान औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ येताच नाशिक येथुन हैद्राबादला जाणारा ट्रक क्रमांक के.ए. 56-4123 आणि तरुणांच्या मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, ज्यात आदीत्य आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांनतर ट्रक ताब्यात घेण्यात आला असून, गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


मांजरी गावात शोककळा...


अपघातात मृत्यू झालेले आदीत्य आणि यश हे मांजरी गावातील आहे. तर आदीत्य आणि यश हे लहानपणीचे मित्र असून, दोघांचे सोबतच एकत्र शिक्षण झाले आहे. सद्या ते औरंगाबाद शहारतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यासाठी ते दुचाकीवरून रोज अप-डाऊन करायचे. या दोन्ही मित्रांची जोडी गावात चर्चेचा विषय असायची. त्यांच्या दोस्तीचे किस्से गावात नेहमीच चर्चेत असयाचे. पण त्यांच्या अपघाती निधनाची बातमी येताच गावात शोककळा पसरली आहे. 


दुचाकी अपघात एकाच मृत्यू, पत्नीही जखमी 


सिल्लोड-कन्नड महामार्गावरील डोईफोडे फाट्याजवळ झालेल्या दुसऱ्या एका  दुचाकी-क्रुझरच्या अपघातात तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू झालेल्या तरुणाची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सागर ईश्वर सपकाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर हा आपल्या पत्नीसह कन्नडकडे जात असतांना,सिल्लोडकडे जाणाऱ्या क्रुझरने जोरात धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.