Aurangabad municipal corporation elections 2022: राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या 42 बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा अंतीम आराखडा आज प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान आज प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा, प्रभागाच्या हद्दी, व्याप्ती, वर्णन दर्शवणारे विवरणपत्र मनपाच्या मुख्य कार्यलयात, झोन कार्यालयात आणि मनपाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. 


औरंगाबाद महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्याबाबत आलेल्या सूचना व हरकती यांच्या सुनावणी घेत, अहवाल निवडणूक आयोगास सादर करण्यात आला होता. त्यानंतर काही लोकांनी आक्षेप घेतल्याने, त्यातील काही शिफारशी सुधारणा मान्य करून औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या अंतिम अधिसूचनेस निवडणूक आयोगाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा आज प्रसिद्ध होणार आहे. 


औरंगाबाद महापालिकेची निवडणुक पहिल्यांदाच तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यानुसार एकूण 42  प्रभाग असणार असून, एका प्रभागात तीन-तीन वॉर्ड अशी रचना करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद महापालिकेत 126 वॉर्ड तर 42 प्रभाग करण्यात आले होते. 12 लाख 28 हजार 32 मतदारांसाठी प्रारूप प्रभागरचना नकाशा जाहीर करण्यात होता. त्यामुळे अंतिम आराखड्यात खूप काही बदल असणार नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र आज अंतिम आरखडा जाहीर झाल्यावरच सर्व काही समोर येणार आहे. 


इच्छुकांची धाकधूक वाढली...


प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यावर अनेकांना धक्का बसला होता. कारण अनेक वार्डचे तुकडे करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. गेली अनेक वर्षे एकाच वार्डात वर्चस्व प्रस्थापित करून बसलेल्यांना हा मोठा धक्का समजला जात होता. दरम्यान शिवसेना, भाजपकडून आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.