Aurangabad Crime News : औरंगाबादच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असलेल्या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी साडेदहाच्या सुमारास मुकुंदवाडी भागातील स्वराजनगरात ही घटना उघडकीस आली. तर आत्महत्या करण्यापूर्वी 'माझा दहावा व इतर कुठलाही विधी करू नका', अशा आशयाची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. नैनेश पांडुरंग शिरसाठ (33, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. 


नैनेश हा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने ही नोकरी सोडली होती. तर आत्महत्येपूर्वी नैनेशने भावांना चिठ्ठी लिहिली आहे. भावांनो घाबरू नका, मला दवाखान्यात नेण्याची गडबड करू नका. मम्मी पप्पाजवळच थांबा. आता माझा खेळ संपला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्नी व मुलांना सांभाळा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे.


दहावा करू नका...


नैनेश लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटलंय की, 'भावांनो, स्वतःची व मम्मी-पप्पाची काळजी घ्या. माझा मृतदेह घरी नेऊ नका. घाटीत शवविच्छेदन करण्यासाठी न्या. माझा दहावा व इतर कुठलाही विधी करू नका. अंत्यसंस्कार करून थेट लेणीवर राख फेका, हात जोडून विनंती असल्याच सुसाईड नोटमध्ये लिहून नैनेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


पोलिसांकडून तपास सुरु 


घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नैनेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. त्याच्या पश्चात तीन भाऊ, आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. नैनेशने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत. तर या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


Aurangabad: गेल्यावर्षीच्या वर्गणीच्या हिशोबावरून गाव बैठकीतचं सुरु झाला राडा; तंटामुक्त अध्यक्षला थेट...


गडावरून तोल जाऊन 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू...


दुसऱ्या एका घटनेत भांगसीमाता गडावरून पाय घसरून तोल गेल्याने 30  फूट खोल दरीत पडून 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रतन गोरखनाथ जाधव (वय 34 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजता समोर आली असून, अपघात शनिवारी रात्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढत घाटीत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.