Chandrakant Khaire On BJP : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला एक दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यापूर्वी आज शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सभास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. तर याचवेळी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) सुद्धा निशाणा साधला. सोमय्या करत असलेले थिल्लर चाळे संघ परिवाराला शोभतात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सोबतच सोमय्या यांच्या वक्तव्यांची दखल घेण्याची सुद्धा मागणी केली.
काय म्हणाले खैरे...
सभास्थळी पाहणीसाठी आलेले खैरे 'एबीपी माझा'सोबत बोलताना म्हणाले की, भाजप आता खालच्या पातळीवर चालली आहे. किरीट सोमय्या याचं मी पाहिलं. काय बोलतो तो, अभी क्या होंगा तेरा...मी व्याक्य वापरत नाही तो..या अशा पद्धतीने थिल्लर चाळे संघ परिवाराला चालतात का?, त्यांनी नोंद घेतली पाहिजे अशा थिल्लर चाळेमुळे पक्षाचे नाव मोठं होत नाही,पक्षाचे नाव खाली चाललं आहे. हे लक्षात येत नाही, मी उद्या भाषणात मी ठोकून बोलणार असल्याच खैरे म्हणाले.
'त्याची आवकात नाही...'
यावेळी खैरे यांनी नेहमीप्रमाणे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. मुख्यमंत्री यांच्या सभेला दोन दिवस शिल्लक राहिले असताना, जलील यांच्याकडून स्टंटबाजी करण्यासाठी पत्र लिहण्यात असल्याचा आरोप खैरे यांनी केला. तर ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. जलील लोकांना भेटत नाही,त्यामुळे लोकं आजही मलाच खासदार समजतात. 'त्याची आवकात सुद्धा नाही, दिल्लीत जाऊन काम करून घेण्याची' अशीही टीका खैरे यांनी जलील यांच्यावर केली आहे.
सभेची तयारी झाली आहे...
यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, सभेची जोरात तयारी सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस आम्ही सभास्थळी सुरु असलेल्या तयारीवर लक्ष देऊन आहोत. त्यामुळे आता बाहेरील दौरे बंद करण्यात आले आहे. सभेचं येण-जाणं यांचे नियोजन सुरु असल्याच खैरे म्हणाले.