Water Issue: औरंगाबाद शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच आता शहरातील मुख्य लाइनवरील बेकायदा नळ विरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारपासून शहरातील विविध भागातील मुख्य लाइनवरील बेकायदा नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त सुद्धा मागण्यात आला असून, कारवाईला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. तब्बल 1 हजार 855 बेकायदा नळ असल्याची माहिती समोर आली आहे. 


सुनील केंद्रेकरांनी घातले लक्ष....


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेत औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे विशेष जवाबदारी दिली होती. त्यांनतर केंद्रेकर यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 31 पाण्याच्या टाक्यावर अधिकारी नियुक्त करत पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. मात्र टाक्या भरण्यासाठी असलेल्या मुख्य लाइनवर दोन हजाराच्या घरात बेकायदा नळ कनेक्शन असल्याचे समोर आले होते. त्यानुसार आता या बेकायदा नळांवर कारवाई केली जाणार आहे.


अशी आहे बेकायदा नळांची आकडेवारी...


मुख्य लाइनवर तब्बल 1855 बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. ज्यात गांधीनगर,रविवार बाजार ते विद्यापीठ जलकुंभ लक्ष्मी कॉलनीपर्यंत 116 ते 149 बेकायदा कनेक्शन आहेत. तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये 332,  प्रभाग क्रमांक चारमध्ये 174, प्रभाग क्रमांक पाचमध्ये 76,रामनगर ते हॉटेल दिपाली रस्ता 188 ते 230, हनुमाननगर ते शिवाजीनगर 223 ते 255,गजानन महराज मंदिर ते मल्हार चौक 450 ते 540, राहुलनगर ते गुलशन अपार्टमेंट 99 ते 114 बेकायदा नळ कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. 


अन्यथा गुन्हे दाखल करणार 


गेल्यावेळी बेकायदा नळ विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. सोबतच कारवाईला विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी जर पोलिसांचा बंदोबस्त मिळाला तर प्रत्यक्षात कारवाईला सुरवात होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.