Maharashtra Political Crisis: शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत आहे. तर महाविकास आघाडीत मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून बंडाचा निर्णय घेतला असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. दरम्यान यासर्व घडामोडींवर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.तर आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती अशा शब्दात सत्तार यांनी आपली भूमिका मांडली आहे.


काय म्हणाले सत्तार...


आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. पण आम्हाला कधी वेळ मिळत नाही,कधी बोलण्याची संधी मिळत नाही,आमच्या कोणत्याही कामाची चर्चा होत नाही. प्रत्येकवेळी आम्हाला एखाद्या भिकारी सारखे भीख मागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्यथा एवढा मोठा उद्रेक कधीही झाला नव्हता असे सत्तार म्हणाले.


राऊतांवर हल्लाबोल...


तसेच यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर सुद्धा हल्लाबोल केला.याला काही हिंदुत्व कळते का? असे संजय राऊत मला म्हणाले. मी हिंदुत्ववादी पक्षातून निवडून आलो आहे. भगवा झेंडा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे तुम्ही राजकारण करू लागले अनैसर्गिक पद्धतीने ते जनेतला मान्य नाही. असा शब्दात सत्तार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. 


सिल्लोडमध्ये शक्तिप्रदर्शन....


आज सकाळी 10 वाजता सिल्लोड येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅलीची सुरवात केली. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून प्रत्यक्षात रॅलीला सुरुवात झाली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभेनंतर रॅलीचा समारोप होणार आहे. सत्तार यांच्या समर्थनात आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा म्हणून ही रॅली काढण्यात आली आहे.