औरंगाबाद : "हर्षवर्धन जाधव यांना स्टंटबाजी करुन सहानुभूती मिळवण्याची सवय झाली आहे," अशी टीका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये निश्चितच रोष आहे. पण शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाही, असंही दानवे म्हणाले.


हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक
औरंगाबादमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली. हल्ला झाला त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरी नव्हते. प्रचारासाठी ते कन्नडमध्ये आहेत.

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली. त्यामुळे हल्ल्यामागे शिवसैनिक तर नाही अशी शंका उपस्थित केली जात होती.

शिवसैनिक धडा शिकवणारच : अंबादास दानवे
याविषयी अंबादास दानवे म्हणाले की, "हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी माझ्या कानावर आली. जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये निश्चितच रोष आहे. पण शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाही. निवडणूक होईपर्यंत संयम बाळगा, असं आम्ही शिवसैनिकांना सांगितलं आहे. स्टंटबाजी करुन सहानुभूती मिळवण्याची सवय हर्षवर्धन जाधवांना झाली आहे. पण शिवसैनिक त्यांना धडा शिकवणार आहेत हे मात्र नक्की."

शिवसैनिकांनीच हल्ला केला : हर्षवर्धन जाधव
माझ्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला. मला हा हल्ला नामर्दासारखा वाटतो. हल्ला झाला त्यावेळी माझी पत्नी आणि मुलगा असे दोघेच घरात होते. ही निषेधार्ह बाब आहे. मधल्या काळात शिवसेनेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले होते. इतकंच काय तर हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या वडिलांचा खून केला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. परंतु मी संयम बाळगला. परंतु वारंवार आरोप केल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दलच वक्तव्य केलं.

आरोपींकडून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा : संजना जाधव
"दगडफेक करताना आरोपींनी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणाही दिल्या," असं हर्षवर्धन जाधव यांच्या संजना जाधव यांनी सांगितलं. "ही अतिशय दुर्दैवी घटना असून समोरासमोर सामना करावा, पाठीमागून हल्ला करु नये. जय भवानी, जय शिवाजी म्हणतो, त्यावेळी शिवरायांची शिकवण पाळावी, पराभव समोर दिसत असल्याने ही गुंडगिरी सुरु आहे," ही संजना जाधव म्हणाल्या.