अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नव्या स्ट्रेनसाठी अमरावती हे नाव पुढे आले असले तरी राजस्थान येथे डिसेंबर 2020 मध्ये तो आढळून आला. तशी नोंद हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी केल्याची माहिती अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-19 नमुने चाचणी प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. कोरोनाची दुसरी लाट पसरविणारा नवा स्ट्रेन अमरावतीत आढळून आल्याची चर्चा होत आहे. काही प्रसारमाध्यमांवर तसेच सोशल मीडियावर तशा बातम्या झळकत आहेत. त्यामुळे अमरावतीकर भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं डॉ. ठाकरे यांच्याशी संवाद केला.  


संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात एक लाखांवर नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. संसर्गाचा दर वेगवान असल्याने कुटुंबात एका सदस्याला कोरोनाची लागण झाली की पूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळले, अशी स्थिती आहे. संक्रमणासह मृत्यू दरही वाढत आहे. प्रत्येक महिन्यात कोरोनाच्या स्ट्रेनमध्ये बदल होत आहेत. याबाबत (व्हेरीअंट ऑफ कन्सल्ट) विश्लेषण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविले जात असल्याची माहिती डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिली.


डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी सांगितले की, डबल म्यूटेशन म्युटंट 'ई 484 क्यू' आणि 'एल 452 आर' हे आहेत. यात एकूण 15 म्यूटेशन असून हा विषाणूचा एक भाग आहे.. आतापर्यंत 6 म्यूटेशन आढळले आहेत. त्यापैकी हे 2 म्यूटेशन म्युटंट हा डिसेंबर 2020 मध्ये आढळून आला आहे. हा नवा स्ट्रेन नाही. हल्ली 70 टक्के नमुन्यात तो आढळत आहे. त्याचा उगम अमरावती येथे असल्याचे म्हणता येणार नाही अशी माहिती डॉ प्रशांत ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली.