औरंगाबाद : औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर पुढील पाच दिवस पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. औरंगजेब कबर समितीने मागणी केल्यानंतर पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मनाई आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं. आरोप प्रत्यारोप झाले, कारवाईची मागणी करण्यात आली. औरंगजेबाची कबर हा विषय सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला जात आहे.  


गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. ही कबर कशाला असा प्रश्न मनसेने उपस्थित केल्यानंतर तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बॅरिकेड्स देखील लावण्यात आले आहेत. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता ही कबर काही दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती औरंगजेब कबर समितीने पुरातत्व विभागाला केली. या विनंतीचा विचार करुन पुरातत्व विभागाने ही कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे जाता येणार नाही. औरंगजेब कबर समितीने पुरतत्व विभागाला विनंती करण्याचं कारण म्हणजे ही कबर आणि आजूबाजूचा परिसर पुरतत्व विभागाच्या अखत्यारित येतो. 


औरंगजेबाची कबर इतिहास आणि राजकारण
बादशाह औरंगजेब..त्याचं पूर्ण नाव आहे अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर..मुघल सम्राट औरंगजेब जरी या देशाचा स्रमाट राहून गेला असला तरी सुद्धा त्याची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. सत्तेसाठी स्वत:च्या कुटुंबियांना संपवणारा या सम्राटाची राजवट जुलमी होती, असंही इतिहासकार सांगतात. मात्र यासोबतच तो कमालीचा धार्मिक होता आणि याच धार्मिकतेतून त्याची समाधी औरंगाबादच्या खुलताबादमध्ये आहे. कारण मृत्युनंतर याच भूमीत पुरायचं अशी त्याची इच्छा होती आणि त्याचं कारण होतं, ते म्हणजे त्याचे गुरु शेख झैनुद्दीन. हे एक सुफी संत होते, त्यांचा खुलताबादमध्ये दर्गा आहे, खुलताबाद म्हणजे जन्नतला जाणारा मार्ग म्हणून याच दर्ग्यात अत्यंत साध्या पद्धतीने त्याचा दफनविधी झाला आणि त्याची अत्यंत साधी समाधी आहे. याच कबरीवर एमआयएम नेत्यांनी फुलं वाहिली आणि त्यातून राजकारण सुरु झालं. 


औरंगजेब म्हणजे मुस्लिमांचा मसिहा तर त्याने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करुन मारलं होतं म्हणून तो हिंदूंसाठी क्रूरकर्मा. त्याच्या कबरीवर कुठलाही राजनेता गेला की वाद हा ठरलेलाच. आम्ही अल्ला समोर झुकतो औरंगजेबासमोर नाही असं कधी काळी म्हणणारे एमआयएम खासदार इम्तियाज जलील देखल समाधीवर फुलं वाहण्यात अग्रेसर होते आणि यामुळेच हिंदुत्ववादी पक्ष तर तुटून पडले. हिंदुत्ववादी पक्षाकडून आरोप होत आहे. मुस्लिमांची अस्मिता चेतवण्यासाठी एमआयएम औरंगजेबाच्या कबरीचा वापर करत आहे तर हिंदूंना आपल्याकडे ओढण्यासाठी इतर पक्ष आता औरंगबजेबाच्या इतिहासाचा वापर करत आहेत.



संबंधित बातम्या