Aurangabad News : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद काही थांबता थांबत नाही. त्यातच आता भर पडली आहे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेची. कारण या पत्रिकेत शिवसेनेचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे नाव डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांचे मात्र यात नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे दानवे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा यावेळी उपस्थिती असणार आहे. तर औरंगाबादमधील सर्वच मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. विद्यापीठाकडून छापण्यात आलेल्या पत्रिकेत भाजप-शिंदे गटाच्या मंत्र्यांचे नाव आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच पत्रिकेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या सुद्धा नावाचा उल्लेख आहे.





पत्रिकेवरुन नवा वाद.…
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाने शासकीय पत्रिका छापली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने इतर स्थानिक मंत्र्यांची नाव आहेत त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव असणंही अपेक्षित होते. मात्र पत्रिकेत त्यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे दानवे समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या या पत्रिकेवरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.


कार्यक्रमाचं निमंत्रण आहे, निमंत्रण पत्रिकेत नाव नाही : अंबादास दानवे
"मला कार्यक्रमाचं निमंत्रण आहे, परंतु निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. मला वाटते कुलगुरुंना अडचण वाटली असेल किंवा सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करायचे असेल म्हणून हे केले असेल. पण मी वैधानिक मार्गाने कुलगुरुंविरोधात आजच हक्कभंग मांडणार आहे. राजशिष्टाचारानुसार सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेच पाहिजे. मी कार्यक्रमाला जाणार नाही. माझे पूर्वनियोजित कामे असल्याने बुलढाण्याला निघालेलो आहे. पुढील दोन दिवसात सर्व शिवसैनिकांना घेऊन धूमधडाक्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन करेन," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


Aurangabad : एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण,अंबादास दानवेंना निमंत्रण नाही?