औरंगाबाद : औरंगाबादेत भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यावरच हल्ला करण्य़ात आला आहे. आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या दोघांनी कुणाल मराठे नावाच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. वॉर्डात निर्जंतुकीकरण केल्यानं भागवत कराड यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते कुणाल मराठेंनी केला आहे. औरंगाबादेतल्या कोटला कॉलनीत रात्री ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. तर कुणाल मराठेच्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी हर्षवर्धन आणि वरुण कराड या दोन मुलांसह सोनवणे नामक व्यक्तीवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वार्डाच निर्जंतुकीकरण करण्यात आलं. त्यानंतर जेवण करत असताना घरात घूसून मारहाण करण्यात आली. वार्डात आम्ही सुविधा देऊ तुम्ही राजकारण करु नका असं म्हणत मारहाण कऱण्यात आली असल्याचा आरोप कुणाल मराठे यांनी केला आहे. तसेचं कोटला कॉलनी या वॉर्डमधून भागवत कराड यांचा मुलगा येणारी महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे तू वॉर्डमध्ये  लोकांना का मदत करतो? असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप कुणालने केला आहे.

दरम्यान, हे मुला-मुलांचे भांडण असून पोलिस याबाबत चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार भागवत कराड यांनी माझाशी बोलताना दिली आहे.