औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता 'सारी'चे नवे संकट उभे ठाकले आहे. अकरा दिवसात सारीने (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) दहा जणांचे बळी घेतले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे संकट आल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील सारीच्या 23 रूग्णांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे आहेत. रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात 29 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत 103 रूग्णांनी उपचार घेतले. यातील 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अकरा दिवसात दहा जणांचे बळी
‘सारी’ या आजाराने अकरा दिवसात दहा जणांचे बळी घेतले असून शहरातील सारीच्या रूग्णांची संख्या 103 वर पोहचली आहे. सद्यस्थितीत सारीच्या 23 रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके काढण्यास सुरूवात केली. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, उलट्या आदी आजाराने त्रस्त रूग्ण वाढत गेले. कोरोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत.
कोरोनासारखीच लक्षणे
सारी म्हणजे सिव्हिअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस. यात रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो़ त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सारीच्या रूग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत 103 रूग्णांवर सारीच्या आजाराने उपचार केल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसने मार्च महिन्यात शहरात शिरकाव केला. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाचे 14 रूग्ण आढळून आले. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सारीचेही रूग्ण आढळून येत होते़ सारी आणि कोरोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारीच्या रूग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यासून खासगी आणि शासकीय रूग्णालयांकडून सारीच्या रूग्णांची माहिती महापालिकेकडे येत आहे. सारीच्या 103 रूग्णांपैकी निम्मे रूग्ण हे घाटी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित रूग्ण हे शहरातील विविध रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्या सर्वांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत, असं घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन डोईबळे यांनी सांगितलं आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनासह 'सारी'चे संकट, अकरा दिवसात दहा जणांचे बळी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
09 Apr 2020 09:31 AM (IST)
कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) संकट आले आहे.
शहरात सारीच्या 23 रूग्णांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -